मला अजूनही आठवतोय तो प्रयोगा आधी माझ्या पोटात आलेला गोळा...
शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर येथे ७ फेब्रुवारी २०२५ रोजी माझा पहिला प्रयोग होता. पहिला प्रयोग असल्यामुळे मनात प्रचंड दडपण आणि उत्सुकता होती.
त्या वेळी कविता माडकर आणि प्रशांत दामले यांनी मला खूप आधार दिला. दिग्दर्शक आणि लेखक अद्वैत दादरकर यांनी मला सांगितले, “आता बिनधास्त काम कर. प्रयोग उत्तम होणार!!”
मी “एका लग्नाची पुढची गोष्ट” या नाटकात अभिनेता म्हणून काम करतो. फेब्रुवारी २०२५ मध्ये प्रशांत दामले यांनी मला विचारलं आणि मी क्षणाचाही विचार न करता होकार दिला. आणि तिथून माझा व्यावसायिक रंगभूमीवरील प्रवास सुरू झाला.
दुसरा प्रयोग ८ फेब्रुवारीला यशवंतराव नाट्यगृह, कोथरूड, पुणे येथे होता. त्या प्रयोगाला माझी बहीण आणि मेहुणे आले होते.
प्रयोग संपल्यानंतर काही वयस्कर महिला आपापसात बोलताना म्हणाल्या, “अरे हा कलाकार बदलला वाटतं दामलेंनी.”
आणि त्यानंतर त्यांच्यातलीच एक महिला म्हणाली, “पण काम खूप छान करतोय हा मुलगा!!”
हा माझ्यासाठी खूप सुंदर आणि मजेशीर अनुभव होता. अशा अनेक छोट्या-छोट्या गोष्टी, किस्से आणि आठवणी या प्रवासात जमा होत गेल्या.
आतापर्यंत माझे वैयक्तिक १०७ प्रयोग पूर्ण झाले आहेत. या प्रवासातील अजून अनेक गोष्टी मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे.
हा फक्त रंगमंचाचा प्रवास नाही...
हा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा प्रवास आहे.